महाडमध्ये दुकाने रस्त्यावर, पालिका आणि पोलीस प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध

Mahad Bajapeth
महाड ( मिलिंद माने ) :
महाड बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी महाड नगरपालिका व वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनाअभावी बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले आहेत. शहरात असलेले दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आपला माल समोरील नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचाऱ्यांना देखील त्रास होताना दिसत आहे. याबाबत कायम तक्रारी होवून देखील महाड नगर पालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाई करून सोडून देत आहेत.
महाड शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानदार आणि कर्मचाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होत नाही अशी चर्चा गावात सुरु आहे.
महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. यामुळे तालुक्यासह शेजारील पोलादपूर, माणगाव, मंडणगड, म्हसळा आणि गोरेगाव येथून नागरिक खरेदीसाठी येत असतात. शिवाय महाड हे ऐतिहासिक शहर असल्याने याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक, शिवप्रेमी, भीमसैनिक दाखल होत असतात. गेली अनेक वर्षात शहराचा विस्तार देखील वाढू लागल्याने लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी पाहता मुख्य बाजारपेठ रुंदीकरण झालेले नाही. यामुळे मुख्य बाजारपेठेत अवजड वाहन शिरताच अन्य वाहनांना रस्त्यावरील भाजीविक्रेते व दुकानदारांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहनांना अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत आहे.
मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण नगर रचना आणि विकास यामधील नियमात बसवला गेलेला नाही. यामुळे बाजारपेठ अरुंदच राहिली आहे. त्यातच अनेक दुकानदार आपला माल आणि विक्रीला आलेले सामान रस्त्यावर किंवा गटारावरच लावून ठेवत असल्याने पादचाऱ्यांना देखील त्रासदायक ठरत आहे. महाड शहरात ही अवस्था छ.शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी मार्ग, पिंपळपार ते थेट जुना पोस्ट, सुकट गल्ली या ठिकाणी शहरातील अंतर्गत रस्ते या रस्त्यांवर कायम वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठ आणि अन्य जोड मार्गांवर रत्यालगत बसलेल्या शेतकरी, छोटे भाजी विक्रेते यांच्याकडून दुकानदार पायरीवर बसण्याचे पैसे मोजतात असे सांगण्यात येते त्यामुळे पालिका देखील ठराविक रकमेची पावती बनवून पैसे वसुल करण्याचे काम करतात.
शहरात विविध ठिकाणी जोड मार्गांवर भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यातच हातगाड्यांचा मोठा वावर आहे. रस्त्यांचे कोपरे फळ विक्रेत्यांनी पकडले आहेत. तर गाळे भाड्याने घेवून देखील गाळे रिकामे ठेवून दिवसभर कांही भाजी विक्रेते स्पर्धा लावून रस्त्यांवर बसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजी विक्रेत्यांनी तर आमच्या बापाचा रस्ता अशा तोऱ्यात रस्ता अडवला आहे याला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोणती कारवाई करू शकत नाही असे संबंधित भाजी व्यापारी लोकांना सांगत आहे यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे हात बरबटलेले तर नाहीत ना अशी शंका सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजी विक्रेते फळ विक्रेते जोरजोरात ओरडून ग्राहक आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दिवसभर सुरु राहते.
मात्र यामध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल होताना दिसत आहेत. छ.शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी यादरम्यान असलेल्या भाजी विक्रेत्यांनी तर बिनदिक्कत रस्त्यावर ठाण मांडले आहे. सद्या या मार्गावरून दापोली, मंडणगड, खेड कडे जाणाऱ्या आणि त्याठीकानाहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. यामध्ये बसेसचा देखील समावेश आहे. या वाहनचालकांना देखील याचा त्रास होताना दिसतो. छ.शिवाजी चौक ते राजमाता जिजाऊ गार्डन पर्यंत देखील पदपथ शिल्लक ठेवलेला नाही. स्थानिक विक्रेत्यांनी या पदपथावर विक्री सुरु केल्याने याठिकाणी लागणाऱ्या रिक्षा देखील अनेक वेळा या विक्रेत्यांच्या पुढे रस्त्यावर रिक्षा उभ्या करतात.
छ.शिवाजी चौक याठिकाणी पोलीस वाहतूक शाखेचे केंद्र तर महाड नगर पालिकेचे प्रशासकीय भवन आहे. मात्र रस्त्यातील भाजीवाल्यांचे अडथळे, दुकानांचा माल याकडे पालिका आणि पोलीस कर्मचारी डोळेझाक करत असल्याने या विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. वाहतूक आणि शहर विकासाचे नियोजन नसल्याने ही अवस्था दिसून येत आहे. एकीकडे मतदार जपण्याचे काम पुढारी करत असल्याने नकळत रत्यावर बेकायदेशीर विक्री करणाऱ्या लोकांना सरंक्षण मिळत आहे. तात्पुरती कारवाई केल्यानंतर अवघ्या कांही मिनिटातच पुन्हा निर्ढावलेले दुकानदार पुन्हा आपला माल रस्त्यावर लावत आहेत. आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही अशा अविर्भावात ते वावरत आहेत. स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे देखील या दुकानदारांना पाठबळ आहे.
कारवाई करताना कांही टपऱ्या का सुटतात ?
ज्या ज्या वेळेस कारवाई झाली त्या त्या वेळेस शहरातील कांही रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जात नाही. या टपऱ्या शहरातील कांही पुढाऱ्यांनी उभ्या करून भाडे तत्वावर दिल्या आहेत. यामुळे साहजिकच यावर कारवाई होत नाही. छ.शिवाजी महाराज चौकातील कांही अनधिकृत गाळे देखील विनापरवाना उभे आहेत. याच ठिकाणी रस्त्यावर भाजीचे दुकान रस्त्यावर आणून शेजारीच गाळा रिकामा ठेवून उसाचा सरबत विकणाऱ्या विक्रेत्यावर देखील कारवाई करण्यास पालिका प्रशासनाचे हात धजावत नाहीत. तक्रारी झाल्यानंतर स्थानिक सर्वसामान्य विक्रेत्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते मात्र अन्य कांही लोकांना अभय दिले जात आहे.
स्वतंत्र पथकाची गरज.
सद्य स्थितीत शहरात वाहतूक नियोजनासाठी एकच पोलीस कर्मचारी आहे. हा पोलीस कर्मचारी देखील फक्त छ.शिवाजी चौक परिसरातच घिरट्या घालत पावत्या फाडण्याचे काम करत आहे. तर पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे दुकानदारांच्या अगदी जवळचे असल्याने कारवाई होण्यापूर्वी या दुकानदारांना सावध करण्याचे काम करतात. यामुळे महाड शहरात स्वतंत्र पथकाची गरज निर्माण झाली आहे. पे पार्क सुविधा देखील सुरु करण्यात आली होती मात्र हि योजना देखील बारगळली आहे. शहरात छ.शिवाजी चौक आणि जुन्या भाजी मार्केटची जागा पडीक आहे याठिकाणी पे पार्क सुविधा निर्माण केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *