महाडच्या ऊसतोड मजुरांकडून हातनूरमध्ये मोरांची शिकार; गावकऱ्यांनी रंगेहात पकडले, महाडमध्येही अशीच शिकार सुरू असल्याची शक्यता?

Mor killer
महाड | मिलिंद माने 
हातनूर परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या महाड तालुक्यातील मजुरांच्या टोळीने दोन मोरांची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थांच्या सजगतेमुळे या टोळीला रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांना वनविभाग आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गावकऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि धाडस वनविभागाने कौतुकास्पद ठरवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सहा जणांची ऊसतोड मजुरांची टोळी हातनूर परिसरात आली होती. संशयास्पद हालचाली पाहून ग्रामस्थांनी लक्ष ठेवले आणि शनिवारी रात्री अजित सोनटक्के यांच्या शेताजवळ बॅटरीचा प्रकाश दिसताच त्यांनी तात्काळ सुमारे २५ ग्रामस्थांच्या मदतीने टोळीला घेरले. चौकशीत त्यांनी दोन मोरांची शिकार केल्याचे उघड झाले.
या पथकाने वामन जाधव (वय ३६ रा. कुंभार्डे, ता. महाड ), रत्नाकर पवार (वय ३९ रा. आंबिवली, ता. महाड), किशोर पवार (वय २२ रा. सापेगाव, ता. महाड), सचिन वाघमारे (वय २३), सत्यवान वाघमारे (वय २१) आणि नितीन वाघमारे (वय २०) (तिघे रा. चोचिंदे, ता. महाड) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी मोरांची पिसे, लगोर, बॅटरी आदी शिकारीची साधने जप्त करण्यात आली असून, आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर महाड तालुक्यात जंगल तोडीच्या नावाखाली अवैध शिकार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हातनूरप्रमाणेच दुर्गम भागातही अशीच शिकार होत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणावर अधिक कठोर नजर ठेवण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *