सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (वाळवा तालुका) शहराचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या शिफारशीवर केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. राज्य शासनाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून आजपासून इस्लामपूर नगर परिषदेचं नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर नगर परिषद’ असं करण्यात आलं आहे.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर आज केंद्र व राज्य सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयाबद्दल मी दोघांचे मनःपूर्वक आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेची ही मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे.”
या निर्णयासाठी गेल्या पाच दशकांपासून प्रयत्न सुरू होते. १९७० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत सबनीस यांनी ही मागणी प्रथम केली होती. १९८६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या सभेत “हे ईश्वरपूर आहे” असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपा नेते अण्णा डांगे आणि संभाजी भिडे यांसह अनेक नेत्यांनी ही मागणी कायम ठेवली होती. अखेर केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर इस्लामपूरचं नामांतर अधिकृतपणे ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे.