बाळसई येथे पावसाच्या दमदार हजेरीत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा!

Balsai dahihandi
सुकेळी (दिनेश ठमके) :
रायगड जिल्ह्यात सर्वत्र दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. नागोठणे विभागातील बाळसई गावामध्ये देखिल दहीहंडी उत्सव उत्साही वातावरणात पार पडला. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने देखिल गोविंदावर कृपा करीत पावसाने सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदामध्ये उत्साह संचारला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखिल बाळसई गावातील बाळगोपाळांनी दहीहंडीचा मनसोक्त आनंद लुटला. गावातील अनंत ठमके यांच्याकडुन बांधण्यात आलेल्या मानाची हंडी चार थर लावुन बाळगोपाळांनी फोडली. गोविंदानी साखळी पकडुन ढोल- ताशांच्या गजरात तसेच बोल बजरंग बळी की जयच्या ताळावर सर्वच गोविंदांनी ठेका धरला होता.
त्याचप्रमाणे पारंपारिक परंपरा म्हणुन सुरू असलेल्या अनेक कान्होबा भक्तांच्या अंगात कान्होबाचे वारे देखिल आले होते. मानाची हंडी फोडल्यानंतर गावातील इतर बांधण्यात आलेल्या ५ ते ६ दहीहंड्या फोडण्यात आल्या. बाळसई गावातील हा दहीहंडी उत्सव गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *