पेण शहरातील “आई डे केअर” संस्थेच्या विशेष (गतिमंद) विद्यार्थ्यांकरीता सामाजिक कार्यकर्ते राजू पिचिका (रामेश्वर कन्स्ट्रक्शन) यांच्या पुढाकाराने लाहीरी निवास प्रांगणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने बाळगोपाळांना आकर्षक टी-शर्ट, पॅन्ट तसेच खाऊ व बक्षिसे देण्यात आली.
भर पावसात 69 विशेष मुले गोविंदाच्या गाण्यांच्या तालावर नाचत-गात सहभागी झाली आणि निरागस हास्याने वातावरण आनंदमय केले. हंडी फोडताना मुलांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले.
गेल्या 14 वर्षांपासून राजू पिचिका यांच्या माध्यमातून “आई डे केअर” संस्थेला सातत्याने मदत व सहकार्य मिळत असून, संस्थेच्या उपक्रमांना बळ मिळत आहे, असे संस्थापिका स्वाती मोहिते यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, राजू पिचिका आदी मान्यवरांसह पेण पत्रकार उपस्थित होते.