स्वातंत्र्यदिनीही पोलादपूर तालुका लोडशेडिंगच्या जोखडात; स्मार्ट मीटर सक्तीवरून संताप!

स्वातंत्र्यदिनीही पोलादपूर तालुका लोडशेडिंगच्या जोखडात; स्मार्ट मीटर सक्तीवरून संताप!
पोलादपूर (शैलेश पालकर) :
तालुक्यातील विद्युतप्रवाह सुरळीत राहण्यासाठी गेल्या दोन मंगळवारी लोडशेडींग घेणाऱ्या महावितरणने स्वातंत्र्यदिनीदेखील पोलादपूर शहरातील काही भागातील गा्रहकांना विद्युतपुरवठा बंदीच्या जोखडामध्ये अडकविल्याचे दिसून आले. यामुळे विद्युत ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसून आले. स्मार्ट मीटरची सक्ती करण्यासाठी लोडशेडींगची युक्ती महावितरणच्या अभियंत्यांनी अवलंबिल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील शहरासह अर्ध्याअधिक ग्रामीण भागात 5 ऑगस्टरोजी तारा ओढणे, जंपर बसविणे तसेच अन्य कामांसाठी महावितरणतर्फे विद्युत पुरवठा बंद ठेऊन दुरूस्तीची कामे करण्यात आली. यानंतर पोलादपूर तालुक्यातील उर्वरित ग्रामीण भागामध्ये 12 ऑगस्ट रोजी याच कामांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा लोडशेडींग जाहिर करून विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला. या लोडशेडींगमुळे पोलादपूर तालुक्यात सणासुदीच्या काळात विद्युतप्रवाह बंद पडणार नसल्याचे सांगितले गेले.
स्वातंत्र्यदिनासारखा राष्ट्रीय सण असताना सकाळी साडेसहा वाजल्यापासून विद्युतप्रवाह खंडीत झाला. अधिक चौकशी करता पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर येथील डीपी रोहित्र बंद झाल्याने स्वातंत्र्यदिनीदेखील वीजग्राहक ‘महावितरण’च्या विद्युतपुरवठाबंदीच्या जोखडात अडकल्याची माहितीअंती समजून आले.
विद्युतप्रवाह सुरू होण्यासाठी किती काळ लागेल, याबाबत चौकशी करताना विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार डीपी बंद झाल्यास किती दिवसांपर्यंत विद्युतपुरवठा बंद ठेवावा, याबाबत मुभा असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आली. एकीकडे, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर्सची सक्ती विद्युत ग्राहकांवर करता येणार नसल्याचे विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये कथन करूनही पोलादपूर तालुक्यात अभियंत्यांकडून जनमित्रांद्वारे अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर्स बसविण्याची सक्ती केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, अधिकाधिक ग्राहकांनी स्मार्टमीटर बसवून न घेतल्यास विद्युतपुरवठा बंदीची टांगती तलवार ग्राहकांच्या माथी ठेवण्यात आली आहे.
एमइआरसी म्हणजेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या बाबाआदमच्या जमान्यातील डीपी बसविण्याबाबतच्या निर्देशांनुसार किती दिवसांमध्ये डीपी बसवावा आणि ग्राहकांना विना विद्युतवापराची सवय लावायची, याबाबतचे निकष पुढे करायचे दुसरीकडे विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी अनुदान द्यायचे आणि तिसरीकडे स्मार्ट मीटरच्या सक्तीने ग्राहकांचे आर्थिक शोषण करायचे, हे धोरण ग्राहकांच्या हिताविरोधात असल्याने तालुक्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पोलादपूर शहरातील आनंदनगर, जुना महाबळेश्वररस्ता, भैरवनाथनगर, चित्रेंची गढी, प्रभातनगर पूर्व वसाहत तसेच प्रभातनगर पश्चिम लोकवस्ती याठिकाणी दिवसभर विद्युतपुरवठा खंडीत राहिल्यानंतर याठिकाणी अन्यप्रकारे विद्युतपुरवठा तातडीने सुरू करता येऊ शकत असूनही विद्युत अभियंत्यांनी स्वातंत्र्यदिनी वीजग्राहकांना तब्बल 12 तासांपेक्षा अधिककाळ विद्युतपुरवठा बंदीला सोसण्यास भाग पाडल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *