माणगाव तालुक्यातील संत निरंकारी सत्संग भवनसमोर ११ ऑगस्ट २०१८ रोजी घडलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी सौरभ उर्फ बेंड्या हरिश्चंद्र सावंत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी हा निकाल दिला.
या प्रकरणातील मयत विशाल उर्फ बाळू उर्फ भिम श्रीपत जुमारे याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपीने वैमनस्य ठेवून ११ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता खरवली येथील संत निरंकारी हॉलसमोर विशाल जुमारे याच्यावर हल्ला केला. त्यावेळी विशाल आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना आरोपीने त्याच्यावर मारहाण करत खिशातील चाकूने छातीच्या डाव्या बाजूस वार केला. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला.
घटनेवेळी फिर्यादी दिनेश आडीत, संकेत धनाजी आडीत, कल्पेश सदू आडीत, श्रीकांत चंद्रकांत तांबट व नथूराम राजू दसवते हे उपस्थित होते. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान अति. सरकारी अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी प्रभावी युक्तिवाद करत महत्त्वाचे पुरावे व साक्षी सादर केल्या. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.