शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी फोडण्याची शिस्तबद्ध परंपरा अस्तित्वात असून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानकडून नियोजन केले जात आहे. शहरातील 25 दहीहंड्या 13 वाड्या व वस्त्यांकडून फोडण्यात आल्याची माहिती दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष महाडिक यांनी दिली.
पोलादपूर शहरातील जाखमाता नगर, गोकुळ नगर, साईनाथ नगर, तांबड भुवन मित्र मंडळ, जोगेश्वरी गाडीतळ, शिवाजीनगर, सिद्धेश्वर आळी, स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली, आनंदनगर, भैरवनाथ नगर, काळभैरवनाथ पथक आणि महिला मंडळ या 13 गोविंदा पथकांकडून शहरातील विविध भागातील खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडी फोडण्यात आल्या.
समदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हंडी फोडण्यासाठी विविध नगरांचे नियोजन करण्यात आले. पोलादपूर शहरात श्री काळभैरवनाथ देवस्थानतर्फे दहीहंडीचे थर व उंची, राजकीय टीशर्ट तसेच अन्य नियमांबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असते. यामुळे कुठल्याही प्रकारचे वाद अथवा गोविंदा जखमी होण्याचे प्रसंग टाळले जात आहेत.
पोलादपूर शहरामध्ये राजकीय प्रसिद्धीच्या हेतूने दहीहंडीचा गैरवापर सातत्याने टाळला जात असून सलोख्याचे वातावरण या उत्सवाद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.