दिवेआगर समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना जीवदान; स्थानिक तरुणांचे धाडसी बचाव कार्य

बोर्ली पंचतन । मकरंद जाधव
शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी पुण्याहून आलेले आदित्य भिसे, अभिषेक साळवे, भूमी बोऱ्हाडे, शबिल शेख, अभिषेक जाॅर्ज आणि तन्वी जगताप हे तरुण पोहत असताना त्यातील अभिषेक साळवे (२३), भूमी बोऱ्हाडे (२१) आणि आदित्य संदीप भिसे (२४) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले.
समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे तिघेही बुडू लागल्याने काही काळ घटनास्थळी धावपळ उडाली. यावेळी मदतीसाठी त्यांचा आवाज ऐकताच पोर्ट केबिन विसर्जन पॉईंट येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे यांनी तातडीने बचावकार्यासाठी आवाहन करताच दिवेआगर येथील गोविंदा मिरवणुकीतील ग्रामस्थ प्रणय चोगले, विघ्नेश चोगले, योगेश चोगले, विष्णुदास चोगले यांच्यासह इतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. जेट स्कीच्या सहाय्याने धाडसी बचाव कार्य करत तिघांनाही समुद्रातून बाहेर काढले.
पाण्यात बुडाल्याने तिघांच्या नाकात व तोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तिन्ही पर्यटकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व घटनेची माहिती जाणून घेतली. दिवेआगरसारख्या पर्यटनस्थळी समुद्राचा आनंद घेताना पर्यटकांनी पाण्याची खोली, लाटांचा वेग आणि समुद्राची स्थिती लक्षात घेऊनच पोहावे.
सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन व सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी केले. वेळीच मदतीला धावलेल्या कोळी बांधवांमुळे तीन पर्यटकांचा जीव वाचला असून त्यांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेचे त्यांनी कौतुक केले.
दिवेआगरच्या समुद्रकिनारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसह आवश्यक बचाव साधने व आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.