पोलादपूर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाने जपली परंपरा; यंदा लोकाभिमुखतेचा नवा अध्याय

पोलादपूर पोलीस ठाण्यातील गणरायासमोर महिलाभगिनी अन् पत्रकार बांधवांनी केली आरती; भाद्रपद पौर्णिमेला होणार भक्तीभावाने विसर्जन

पोलादपूर | प्रतिनिधी 
तालुक्यातील गणेशोत्सव आता अनंत चतुर्दशीच्या सार्वजनिक गणेशोत्सवापुरताच राहिला असला तरी त्यापुढे आणखी एक दिवस चालणाऱ्या पोलादपूर पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवानेदेखील यंदाच्या वर्षापासून लोकाभिमुखता आणण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस ठाण्यातील गणरायासमोर सोमवारी सायंकाळी, पोलीस अधिकारी, महिला पोलीस व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत महिलाभगिनी अन् पत्रकार बांधवांनी आरती केली. पोलिस ठाण्यातील या गणेशमूर्तीचे विसर्जन २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य मिरवणूकीने होणार असून यावेळी पोलादपूर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी व महिला भगिनींनी सहभागी होऊन गणेशोत्सवाच्या सांगतेचा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी केले आहे.
 पोलादपूर शहर व तालुक्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशोत्सव सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल १,८१० घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करुन सुरू झाला. याचदिवशी ७ सार्वजनिक गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यात येऊन अनंत चतुर्दशीपर्यंतचा गणेशोत्सवाचा लोकोत्सव सुरू झाला. पोलादपूर पोलीस प्रशासन याकाळात वाहतूक नियंत्रण व बंदोबस्तासाठी सज्ज राहिले असतानासुद्धा पोलादपूर पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील ३७६ घरगुती व १ सार्वजनिक गणेशमुर्तीचे ढवळी, कामथे, घोडवनी, चोळई तसेच उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.  पोलादपूर शहरासह कुडपण, कोतवाल, देवपूर, तुर्भे खोडा, बोरघर, धारवली, हावरे, साखर, वाकण, कामथे, देवळे, आडावळे, सडवली, पितळवाडी या गावांमध्ये गणेशमूर्तीचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. पोलादपूर तालुक्यातील १ हजार ८१० गणेशमूर्तींपैकी ३७६ घरगुती गणेशमूर्तीचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात आले आहे. गुरुवारी पोलादपूर तालुक्यात ५३० गौरींचे आगमन होऊन शुक्रवारी गौरी पूजनानंतर शनिवारी गौरी-गणपतींच्या विसर्जन करण्यात आले. यामध्ये काही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तींचाही समावेश असतो.
पोलादपूर तालुक्यातील ७ सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एका गणेशमुर्तींचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात आले असून, चार गणेशमुर्तींचे पाचव्या दिवशी झाले तर दोन गणेशमुर्तींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. यानंतर शनिवार, दि. २६ सप्टेंबररोजी भाद्रपद पौर्णिमेच्या सायंकाळी पोलादपूर पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाच्या गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक निघणार आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाने यंदा जपली परंपरा अन् सुरू केली लोकाभिमुखता
पोलादपूर तालुक्यातील पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाला गेल्या अनेक वर्षांपासून बंदोबस्त व वाहतूक नियंत्रणात व्यग्र राहणाऱ्या यजमान पोलीसांचीच अनुपस्थिती गणरायाला जाणवत असे. यात यंदा सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी बदल करून लोकाभिमुखता आणण्यासोबतच महिला पोलीस व पोलीस कर्मचारी यांना भक्तिभावाने गणेशोत्सवात सहभागी होण्याची मुभा दिली. परिसरातील महिला व तरुणी देखील या गणेशाची सेवा करण्यासाठी उपस्थित राहात आहेत. दररोज संध्याकाळी गणरायासमोर महाआरती आणि नैवेद्य दाखवला जात असल्याने पोलीसांचे सोशल इंजिनिअरिंग अधिकच घट्ट होत आहे. सोमवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यातील पत्रकारांना महाआरतीसाठी निमंत्रित करून सन्मानित करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, रायगड प्रेस क्लबच्या पोलादपूर क्लबचे अध्यक्ष सचिन मेहता, ज्येष्ठ पत्रकार धनराज गोपाळ, देवेंद्र दरेकर, संदीप जाबडे आणि सिद्धेश पवार यांच्यासह महिला बचत गटाच्या संचालिका कळंबे तसेच तरुणींनी गणरायासमोर महाआरती केली. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांच्यासह, उपनिरीक्षक मंगेश मुंडे व सतीश पवार, महिला अंमलदार जयश्री सर्णेकर तसेच महिला पोलीस बनसोडे, निकम, लंजारे, मदने, कोलते व पोलीस हवालदार स्वप्नील कदम, तुषार जाधव व रवींद्र सरणेकर, रंजेश पवार, सौरव जाधव, साळुंखे, ढोले तसेच अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्याहस्ते पत्रकारांचा प्रातिनिधिक सत्कार ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी स्विकारला.