नगरपंचायत पोलादपूरच्या नगराध्यक्ष पदाचे राजीनामे आणि नव्याने कार्यभार स्विकारण्याच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असून दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महिला आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी तिसऱ्या नगरसेविका स्नेहा सचिन मेहता यांना शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीने संधी देण्यात आली आहे. यानंतरही हा सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ पुढील तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट महिला नामाप्र नगराध्यक्षपदासाठी देखील निवडणुकीचा समावेश असल्याने दुसरा पंचवार्षिक कालावधी संपल्यानंतर थांबण्याची लक्षणे दिसत आहेत.
शिवसेना पक्ष संघटनेच्या निर्णयानुसार शिल्पा देवेंद्र दरेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त नगराध्यक्षपदासाठी स्नेहा सचिन मेहता यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 रोजी पोलादपूर नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमानुसार दाखल करण्यात आले. या नामनिर्देशन पत्राची छाननी पिठासन अधिकारी महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांच्याकडून करण्यात आली. यानंतर नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता 25 नोव्हेंबरला होणार हे निवडणूक कार्यक्रमानुसार निश्चित झाले.
आज मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सव्वा बारा वाजता पोलादपूर नगरपंचायत शिवसेना पक्षाचे गटनेते मनोज प्रजापती, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेवक नागेश पवार, सिद्धेश शेठ, विनायक दीक्षित, निखिल कापडेकर, सोनाली गायकवाड, शिल्पा दरेकर, अस्मिता पवार, स्वीकृत नगरसेविका मृगया शहा आदी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत स्नेहा मेहता यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पहिल्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी त्यानंतर सुनीता पार्टे, नागेश पवार, प्रकाश गायकवाड, राजन पवार, सोनाली गायकवाड, शिल्पा दरेकर आणि आता स्नेहा मेहता या आठव्या नगराध्यक्षा झाल्या आहेत. यानंतरही नगराध्यक्ष पदाचा संगीत खुर्चीचा खेळ सुरू राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नवव्या नगराध्यक्षा म्हणून अस्मिता उमेश पवार यांना संधी मिळून त्यांच्या कालावधीत तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला सत्ताधारी शिवसेना पक्ष सामोरा जाईल.
तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक देखील होणार असून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला उमेदवारासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्या थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक सध्या सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ थांबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.