अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत गंभीर गफलत पाहायला मिळाली. दुपारी तीन ते सव्वा सहा दरम्यान मुरुडसाठी एकही बस न निघाल्याचे प्रवाशांनी सांगितले. या ताणतणावामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला असून, त्यांनी वाहतूक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाशींनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी तीन वाजल्यापासून सव्वा सहापर्यंत आम्ही बसची वाट पाहत होतो, पण मुरुडकडे जाणारी एकही बस आली नाही. अनेक प्रवाशांना कामावर, मुलांच्या शाळेत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुरुडला जायचे होते. बस निघाल्याशिवाय मोठा त्रास सहन करावा लागला,” असे त्यांनी सांगितले.
मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, “अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,” असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती.
अलिबाग आगारात चौकशी केली असता समोर आले की, मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बस वेळापत्रकात अधिक स्पष्टता आणणे, प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.