पोलादपूर तालुक्यातील पाणी टंचाईवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची तातडीची बैठक; दोन पाणी टँकर देण्याची घोषणा

Pravin darekar
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
तालुक्याला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या प्रश्नावरून भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेतली.  या बैठकीला भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे, युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम, राजेश सकपाळ,  प्रतीक सुर्वे उपस्थित होते.  बैठकीनंतर तालुक्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन पाणी टँकर देण्याची घोषणा आ.दरेकर यांनी केली.
पोलादपूर तालुका हा अतिदुर्गम भाग असून, दरी-खोऱ्यात वसलेल्या या भागात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. देवळे धरण 2022 मध्येच गाळाने भरले असून, नव्याने सुरू झालेले गोळेगणी येथील धरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून वाडी-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काही गावांमध्ये अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता विधान परिषदेचे गटनेते भाजपचे आ.दरेकर यांनी पोलादपूरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांची भेट घेऊन संपूर्ण पाणी टंचाईच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी तालुक्याच्या गरजांना प्रतिसाद देत पोलादपूर तालुक्यातील भूमिपुत्र या नात्याने आ. दरेकर यांनी दोन पाणी टँकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपलब्ध करून देण्याचे कबूल केले.
पोलादपूर तालुक्यातील जनतेला या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यातील पाणी टंचाई थोड्याफार प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *