राज्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण खडाजंगी होत असेल तर पोलादपूर तालुक्यातील राजकीय चित्र सौहार्दपूर्ण खेळीमेळीचे असते याचा प्रत्यय पोलादपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीप्रसंगी दिसून आला. या निवडणुकीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांचे वडील ज्ञानोबा मालुसरे यांची संघाच्या अध्यक्षपदी तर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मनोहर पार्टे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
पोलादपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर होताच पोलादपूर तालुक्यातील सर्वपक्षिय प्रमुख पदाधिकारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये विचारविनिमयासाठी एकत्र जमले. यामध्ये शिवसेना शिंदे पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अप पक्ष तसेच भाजप व शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते दिसून आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे सदस्य मतदारांची मृत सदस्यसंख्या सर्वाधिक असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची आणि पाठिंबा कोणी कोणाला द्यायचा, याप्रश्नावर चर्चा होऊन शेवटी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी या निवडणुकीपासून दूर राहिले. यावेळी शिवसेना उबाठा, शेकापक्ष आणि भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सामंजस्याची भूमिका दर्शविली. यावेळी अध्यक्षपदासाठी ज्ञानोबा मालुसरे आणि उपाध्यक्षपदासाठी शेकापक्षाचे मनोहर पार्टे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कार्यकारिणी सदस्यांचे अर्ज भरून बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयदेखील सर्वपक्षियांमध्ये झाला.
यावेळी राजिमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, माजी सभापती दिलीप भागवत, माजी सभापती शैलेश सलागरे, अजय सलागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठोबा पार्टे, महेश दरेकर, संघाचे माजी अध्यक्ष बाबूराव महाडीक, भाजपचे तालुकाअध्यक्ष वैभव चांदे, काटेतळीचे मोरे, सडवलीचे बापू जाधव, अशोक मोरे, बोरजचे सरपंच मालुसरे, सुवर्णा भुवड व अजित कंक तसेच अन्य पदाधिकारी यांनी अधिकृतपणे उपस्थित राहून पोलादपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विजय ग.पवार यांनी कामकाजात सहभाग घेतला.