नगरपंचायत पोलादपूरच्या घरपट्टीवाढीबाबत रायगडचे लोकसभा खासदार सुनील तटकरे यांना पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचातर्फे महाड येथे निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी पोलादपूरांच्या वाढीव घरपट्टीबाबत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत चर्चा करून पोलादपूरकरांना वाढीव घरपट्टीच्या सदोष मूल्यांकन पध्दतीविषयी दिलासा देण्याची अनूकूलता निर्माण केली आहे. मंचाचे शिष्टमंडळ अन्याय्य घरपट्टी वाढीविरोधात महायुतीचे अन्य नेते मंत्री भरतशेठ गोगावले आणि कॅबिनेटमंत्री दर्जा असलेले आ.प्रवीण दरेकर यांनाही निवेदन देऊन याप्रश्नी पाठपुरावा करून अनुकूलता वाढविणार आहेत.
पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचातर्फे राजकीय वजन असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवेदन देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या निवेदनामध्ये सदोष मुल्यमापन पध्दती पूर्णपणे रद्द करून नव्याने योग्य मूल्यमापन करण्यात यावे तसेच घरपट्टीच्या निकषात विशेष सवलत देण्यासंदर्भात आपला प्रभाव उपयोगात आणण्याचा तसेच मूल्यमापन पारदर्शक होण्यासाठी विशेष मूल्यमापन समिती स्थापन करून समितीत नागरिक समस्या निवारण मंचाचे तीन सदस्य समाविष्ट करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले आहे.
रविवारी महाड येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे दर्पण दरेकर, नितीन म.शेठ, महेश निकम, सनी विचारे, गणेश शेठ, सुनील भिलारे तसेच ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पोलादपूरकरांवरील अन्याय्य घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिपाई यांनी नगरसेवकांचा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडून फेटाळला गेल्याने पुन्हा घरपट्टीवाढीचा विषय ऐरणीवर आला असल्याचे सांगितले. यावेळी पोलादपूर तालुक्याला निवडणूक आचारसंहिता नसल्याने पोलादपूरच्या नागरिकांचा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी हाताळून न्याय्य भूमिका घेण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांना भाग पाडण्याचे आवाहन केले.
यानंतर खा.तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत मोबाईलद्वारे चर्चा करून घरपट्टीवाढीविरोधात नव्याने ठराव आल्यास तो मान्य करून पोलादपूरकर जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीदेखील याप्रश्नी जनतेसोबत असल्याचे मान्य करून अनुकूलता दर्शविल्याची माहिती यावेळी खा.तटकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाचे शिष्टमंडळ लवकरच मंत्री भरतशेठ गोगावले आणि कॅबिनेट दर्जाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष आ.प्रवीण दरेकर यांनादेखील भेटणार असून निवेदन देऊन चर्चेद्वारे पोलादपूरकरांवरील वाढीव घरपट्टीचा जिझिया कर दूर करण्याचे आवाहन करणार आहे.