पेण नगरपरिषदेने राबविली शहरात स्वच्छता मोहीम : दर महिन्याला विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार

Pen Palika Worker
पेण ( राजेश प्रधान ) : पेण शहर सुंदर व सुशोभित करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच शहर सुंदर व स्वच्छ राखण्याकरिता अभियान राबविण्यात आले.
पेण नगर परिषदेतर्फे शहरात दररोज स्वच्छता करण्यात येते. परंतु या व्यतिरिक्त महिन्यातून किमान एकदा विशेष स्वच्छता मोहीम राबवून पेण शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा मनोदय मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. रस्ते परिसर गटार नाले स्वच्छ असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह आपला परिसर ही स्वच्छ ठेवावा असे आवाहन करीत स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.
 या स्वच्छता अभियानाची सुरुवात पेण नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशव्दारापासून करण्यात आली. या अभियाना अंतर्गत  धरमतर रोडची स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्त्यालगत असलेली गटारे स्वच्छ करण्यात आली. दूभाजक लगत साठलेली माती काढून दूभाजक स्वच्छ करण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी स्टील डस्टबिन बसविण्यात आले.
 तसेच अतिरीक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विद्युत पोल सुस्थितीत करण्यात आले. रस्ता रुंदीकरणामध्ये व्यवसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणी करण्यात आली. रस्त्यालगतची गटारांची माती उचलण्यात आली. तसेच जेसीबीच्या मदतीने सपाटीकरण करण्यात आले.
 सदर अभियानात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जिवन पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.
या स्वच्छता अभियानात १ जेसीबी, १ ट्रॅक्टर व पेण नगरपरिषदेचे ६० कायम व कंत्राटी सफाई कामगारांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली. सदर अभियान पेण नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व नागरीक असे एकूण १३० जणांच्या मदतीने यशस्वी करण्यात आले. अभियानादरम्यान ०.८० कि.मी. रस्ता स्वच्छ करण्यात आला. यावेळी सुमारे २ टन कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे पाठविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *