पेण शहरात व ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात महाराजांना अभिवादन करून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, आमदार रविंद्र पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आमदार रवीशेठ पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील तसेच नगरपरिषद कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. तमाम शिवसैनिकांच्या वतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण संस्कृती संवर्धनच्या दिव्यांका उतेकर व वेद वास्कर यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.
शहरातील विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पेण तालुका शिव गर्जनेने दुमदुमला. शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन केले.