जुलै महिन्यात मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला अक्षरशः हादरवून सोडले आहे. झाडे कोसळणे, इमारतींचे स्लॅब ढासळणे, नदी-धबधब्यांमध्ये बुडण्याच्या घटना, विजेचा धक्का आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे आतापर्यंत तब्बल २५ जणांना जीव गमवावा लागला असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी संकटाचे सावट अद्याप कायम असल्याचे चित्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.
३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात सरासरी १४.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चालू हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान १,५७९.१३ मिमी इतके झाले असून ते सरासरीच्या ५८.४९ टक्के आहे. मुरबाडमध्ये सर्वाधिक २५ मिमी, ठाणे शहरात २३ मिमी, उल्हासनगरमध्ये १७ मिमी, अंबरनाथमध्ये १५ मिमी, कल्याण आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी ११ मिमी, भिवंडीत ९ मिमी तर शहापूरमध्ये ३ मिमी पाऊस झाला.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनांची यादी धक्कादायक आहे. झाडे कोसळून नागरिकांचा मृत्यू, इमारतींच्या गॅलरी व स्लॅब कोसळण्याच्या घटना, नदी व धबधब्यांमध्ये बुडून मृत्यू, ट्रेकिंगदरम्यान अपघात तसेच विजेच्या धक्क्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वाधिक फटका भिवंडी, ठाणे, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांना बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अद्याप कल्याण आणि शहापूर तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचा शोध सुरू असून बचाव पथके सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसानंतरही दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील उल्हास, काळू आणि भातसा या प्रमुख नद्यांची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली आहे. बारवी धरणात ८२.६१ टक्के, भातसा धरणात ९०.३८ टक्के, तानसा धरणात ९८.६९ टक्के तर मोडकसागर धरण शंभर टक्के भरले असून आवश्यकतेनुसार नियंत्रित विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सध्या मोठ्या पूरस्थितीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसामुळे काही भागांत खबरदारीचा उपाय म्हणून २२९ कुटुंबांतील ७९७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. सध्या सर्व नागरिक सुरक्षितपणे आपल्या घरी परतले असून जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी, धबधबे आणि पुराच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी ठाण्यात एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाचे चोवीस तास लक्ष असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे