अलिबागमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त; एक आरोपी अटकेत

रायगड | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील वरसोली परिसरात कारवाई करत अलिबाग पोलिसांनी सुमारे ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा गांजा व हेरॉईनसह अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी बिहार राज्यातील एका ४६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास वरसोली, ता. अलिबाग येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ३१ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई अनिकेत अनिल छिटारे (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामविनय प्रसाद रामस्वरुपदास यादव (वय ४६) असून तो मूळचा सहरसा, बिहार येथील रहिवासी आहे. आरोपीच्या ताब्यातून २.००६ किलो गांजा (किंमत अंदाजे ५० हजार रुपये) तसेच ७.६६ ग्रॅम हेरॉईन (किंमत २ लाख ६८ हजार १०० रुपये) असा एकूण ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली बॅगही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 
प्राथमिक तपासात आरोपी हा सदर अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(थ) आणि २१(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत. आरोपीचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास सुरू आहे.