मुंबईतील कंपनीतील ऑफिस पार्टीसाठी अलिबागमध्ये आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी तिच्या सहकाऱ्याविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे) असे आहे.
ही घटना ३० जून २०२५ रोजी घडली. संबंधित कंपनीतील चौदा कर्मचारी अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला येथे पार्टीसाठी आले होते. सायंकाळी मद्यपान सुरू असताना पीडित महिला आपल्या कार्यालयीन पगाराच्या कामानिमित्त आधी थांबली होती. काम पूर्ण केल्यानंतर रात्री साडे आठ वाजता ती पार्टीत सहभागी झाली व मद्यपान केले.
मद्याच्या नशेत ती व्हिलामधील जलतरण तलावाजवळ झोपली होती. तिच्या काही सहकाऱ्यांनी तिला उचलून बेडरूममध्ये झोपवले. त्यानंतर पहाटे १ जुलै २०२५ रोजी तीनच्या सुमारास तिला कोणीतरी जबरदस्ती करत असल्याची जाणीव झाली. जाग येताच तिने पाहिले असता अभिषेक सावडेकर हा तिच्या रूममधून बाहेर पडताना दिसला.
सदर महिलेने तत्काळ बाहेर येऊन कंपनीतील सहकारी आयुष ठक्कर व जसपाल सिंग यांच्याकडे विचारणा केली, परंतु त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने अभिषेककडे चौकशी केली असता त्याने रूम बंद करून झोप घेतली. सकाळी अकरा वाजता पुन्हा विचारणा केली असता, त्याने घाबरून माफी मागितली.
याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.