‘पाऊस आला अन् अधिकारी वाहून गेले’; ‘छोटमशेठ’ मात्र सकाळपासून हजर! कुरुळमध्ये आदिवासी दिनी हक्क, संस्कृती अन् विकासाचा जागर

#कुरुळमध्ये आदिवासी दिनी हक्क, संस्कृती अन् विकासाचा जागर
रायगड | अमुलकुमार जैन
 आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि जल, जंगल, जमिनीच्या संवर्धनाचा संदेश देत कुरुळ-उंटीचेभाट येथील क्षात्रैक्य समाज सभागृहात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाला काही अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्याची चर्चा रंगली.
यावेळी प्रास्ताविक करताना भगवान नाईक यांनी, “पाऊस आला अन् अधिकारी वाहून गेले; मात्र आमचे नेते दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ सकाळपासून येथे उपस्थित आहेत,” असा टोला लगावला. जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दत्ता नाईक, भगवान नाईक, माजी अध्यक्ष मुकेश नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिलीप भोईर यांनी आदिवासी समाजाच्या मानवी, सामाजिक आणि आर्थिक हक्कांच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली. आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती, कला, भाषा, वेशभूषा आणि जीवनपद्धती ही देशाची अमूल्य सांस्कृतिक संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन संवर्धनात आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीची गरज व्यक्त करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि टंट्या भिल्ल यांसारख्या आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाचे स्मरण करून त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या वैयक्तिक व शैक्षणिक कामांसाठी आवश्यक जातीचे दाखले, शिधावाटप पत्रिका आणि उत्पन्नाचे दाखले यांचे वाटप करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात असल्याचे भगवान नाईक यांनी सांगितले. ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित होऊनही आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. हक्क, संस्कृती आणि विकासासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार करत कार्यक्रमाची सांगता झाली.