ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत बँकिंग सेवांचा विस्तार, आठ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय, वित्तीय समावेशनासह डिजिटल बँकिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षेवर दिलेला भर यामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आधुनिक वाटचालीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेतली. बँकेच्या कामकाजाचा अभ्यास दौरा करताना रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशनचे जनरल मॅनेजर विकासकुमार साहू, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय भासे आणि शैलेश इंगळे यांच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाला तसेच सहकारी संस्थांना भेट दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या वाटचालीचे सविस्तर सादरीकरण केले. नाबार्डच्या महाराष्ट्र रिजनल ऑफिसचे एजीएम नवल कन्नोर आणि बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांचीही उपस्थिती होती.
वित्तीय समावेशनाच्या क्षेत्रात बँकेने केलेल्या कामाची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण उद्योजकता, स्वयंरोजगार व सूक्ष्म उद्योगांना दिलेले पाठबळ तसेच २० हजारांहून अधिक महिला बचतगटांना बँकेने दिलेली आर्थिक साथ उल्लेखनीय असल्याचे साहू यांनी नमूद केले.
दुर्गम भागातही बँकिंगची दारे खुली
कशेळे, मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी आदी ग्रामीण व दुर्गम भागांत शाखांचा विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा बँकेचा प्रयत्न हा वित्तीय समावेशनाचा प्रभावी नमुना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेने केवळ व्यवसायवृद्धीवर भर न देता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बँकेच्या रुपये ८ हजार कोटींहून अधिक व्यवसायाचा, सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धीचा, आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल परिवर्तन, रिस्क मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा आणि ग्राहकाभिमुख सेवांचा आढावा घेण्यात आला. बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे बँकेने स्वतःमध्ये केलेल्या सुधारणांचेही कौतुक करण्यात आले.
सहकारी संस्थांचे संगणकीकरण देशात सर्वप्रथम करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचाही विशेष उल्लेख करण्यात आला. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने उभारलेले कार्य देशातील सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे विकासकुमार साहू यांनी मत व्यक्त केले.
या यशामागे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची दूरदृष्टी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही साहू यांनी गौरवाने नमूद केले.
AI, डेटा ॲनालिटिक्सवर भविष्यात भर
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल गव्हर्नन्स, अधिक सक्षम सायबर सुरक्षा आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित, जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सहकारी संस्थांसाठी बँकेने केलेले कार्य देशातील इतर संस्थांसाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत विकासकुमार साहू यांनी रायगड डीसीसी बँकेचे अभिनंदन केले.