खालापूरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष; भव्य रॅलीसह पारंपरिक कला-नृत्यांनी रंगला सोहळा

चौक | अर्जुन कदम
खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव यांनी आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन प्रचंड रॅली, पारंपरिक कला नृत्य सादर करून आणि शहीद आदिवासी नेते यांना आदरांजली अर्पण करून साजरा केला.
मुंबई पुणे रस्त्यावरील काळंबा मंदिराच्या आवारात शहीद मान्यवर यांच्या प्रतिमेस भाजप उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे,जिल्हा परिषद सदस्य वैशाली विष्णू खैर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, प्रफुल्ल विचारे, अध्यक्ष मंगळ पोकळा, अंकुश वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून रॅली ला सुरुवात झाली. ही रॅली चौक बाजारपेठ मधून कलोते येथील शिवस्मारक यांना अभिवादन केले यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट यांनी रॅली चे स्वागत केले. खोपोली, खालापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदिवासी भुवन येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात आल्यावर पारंपरिक नृत्य, कला सादर करण्यात आली. रॅलीत वेगवेगळ्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या.आदिवासी दिनाचा जयघोष करण्यात आला.दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.
आदिवासी समाजाचे हक्क, त्यांची संस्कृती आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाळला जाणारा महत्त्वाचा दिवस आहे,जमीन,भाषा आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी या दिवसाला अतिशय महत्व आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योगपती प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला,भाषा, आणि जीवनशैलीचा सन्मान करणे. जल,जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी आदिवासींनी दिलेल्या योगदानाची दखल आजच्या जागतिक आदिवासी दिवसांनी घेतली असल्याचे प्रतिपादन सभापती कृष्णा पारंगे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला पनवेल महानगर पालिका सभापती ममता प्रीतम म्हात्रे उपस्थित होत्या. ममता म्हात्रे यांनी डबा ढोलकी या नाचगाण्याची प्रशंसा केली.आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करून तारपा नृत्य,ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर अनेकांनी लोकनृत्य सादर केले.अबालवृद्ध महिला पुरुष यांच्यासह तरुण तरुणी यांची लाखाच्या घरात उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष मंगळ पोकळा, उपाध्यक्ष महेश पवार, सचिव दिलीप डाके, सह सचिव विष्णू वाघमारे, महिला अध्यक्ष हिरा पवार, खजिनदार वामन पिरकट, सहखजिनदार संजय पवार, पंचायत समिती सदस्य सौ कमल भस्मा, रुपेश जाधव,माजी सरपंच विष्णू खैर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता