दिवसा नोकरी करून रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणाऱ्या सराईत टोळीतील सहावा आरोपी पनवेल तालुका पोलिसांनी अटक केला आहे. या अटकेमुळे अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रक चालक गेंदलाल रामगरीब पटेल यांना धमकी देऊन आणि मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची प्रक्रिया सुरू केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा शोध घेऊन एकूण आठ आरोपींना निष्पन्न केले. यातील पाच आरोपींना आधीच अटक करण्यात आले असून, सहावा आरोपी अजय वाघे याला पनवेल हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.
या आरोपीवर यापूर्वीही खालापूर परिसरात गुन्हे दाखल आहेत, आणि त्याच्या अटकेमुळे परिसरातील इतर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे.