जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथे पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनवणे यांनी धमकी देऊन पत्रकार यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने रायगड पालकमंत्री भरत गोगावले यांना निवेदन देण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना पत्रकार सुरेश वाणी हे पत्रकार म्हणून सदर बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित होते. बैठकीदरम्यान किल्ले शिवनेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याशी अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून, १५ ऑगस्ट होऊ द्या… माझ्यावर याआधीच भरपूर गुन्हे आहेत. वाणी, तुमच्याकडे बघून घेतो,अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पत्रकार यांच्या विषयी “पत्रकारांचे धंदे झाले आहेत” अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आल्याने पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकार हा जनतेच्या समस्या, प्रश्न आणि अन्याय शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे, जनतेच्या समस्या मांडणे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणणे ही पत्रकारांची घटनात्मक लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाची भूमिका आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कथित घटनेचा तीव्र व जाहीर निषेध करण्यात येत आहे.पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पत्रकारांच्या सन्मानाचे, स्वातंत्र्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या पाठीशी सरकार म्हणून आम्ही राहू असे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष राकेश खराडे, प्रदेश उपाध्यक्ष शैलेश पालकर, राहुल जाधव, आदि जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.