नागोठणे वन विभागाने उधळला खैर तस्करांचा डाव; मुद्देमालासह तिघे अटकेत 

नागोठणे वन विभागाने पाळतीने उधळला खैर तस्करांचा डाव
नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे पाली-वाकण मार्गावर धाडसी कारवाई करत अवैध खैर लाकडांची वाहतूक करणारी कार जप्त केली. या कारवाईत १९ नग खैर लाकडे, पेट्रोल कटर मशीन आणि कारसह एकूण ३९,२३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक भाऊसाहेब जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने बुधवार (२२ जुलै) रोजी पहाटे पाली-वाकण रस्त्यावरील वजरोली येथे सापळा रचला. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पालीच्या दिशेने येणारी मारुती अल्टो (एमएच-०६ एएन-२०८३) कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये ०.३४५ घनमीटर क्षमतेचे १९ नग खैर लाकडाचे तुकडे आढळून आले.
वाहनातील तिघांकडे खैर लाकडाच्या वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने ३० हजार रुपये किमतीची कार, ४,२३६ रुपये किमतीचे खैर लाकूड आणि ५ हजार रुपये किमतीचे पेट्रोल कटर मशीन असा एकूण ३९,२३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भाऊ चंदर मोरे (३२), आकाश बाबाजी वाघमारे (२३) आणि महेंद्र मनोहर वाघमारे (२६, सर्व रा. चांदे आदिवासीवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांना अटक करण्यात आली.या कारवाईत वनरक्षक अर्जुन जारवाल, मधुकर सोनवणे, अमोल खांडेकर, रणजीत कारंडे, प्रवीण देवडे आणि व्यंकटी माने यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज साळवी हे करीत आहेत.