
उरण | विठ्ठल ममताबादे
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) आंतरराष्ट्रीय सेवेत प्रवेश केला असून, एअर इंडिया एक्सप्रेसने १५ जुलैपासून नवी मुंबई–अबू धाबी या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट विमानसेवा सुरू केली आहे. देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २०० दिवसांत विमानतळाने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
२५ डिसेंबर २०२५ रोजी देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने वेगाने प्रगती करत आता पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबीसाठी थेट आणि अधिक सोयीस्कर हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. यासोबतच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या अखत्यारीतील सर्व विमानतळ आता आंतरराष्ट्रीय सेवांशी जोडले गेले आहेत.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी हा विमानतळाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत राज्य व केंद्र सरकार, नियामक संस्था आणि सर्व भागधारकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल यांनी नवी मुंबई–अबू धाबी मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असून, भविष्यात अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क निर्माण करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.
अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत २३ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. दररोज सुमारे १५० विमान हालचाली होत असून, पहिल्याच आंतरराष्ट्रीय उड्डाणातून नाशवंत वस्तूंच्या निर्यात मालवाहतुकीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत जलद पोहोचण्याची संधी मिळणार असून, आगामी काळात आणखी अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्ये या विमानतळाच्या जाळ्यात समाविष्ट होणार आहेत.
Related