राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये लागू असलेल्या प्रचारबंदीच्या नियमांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. विविध आदेश व अधिनियमांमध्ये प्रचारबंदीच्या वेळेत भिन्न उल्लेख असल्याने एकसमानता राखण्यासाठी आयोगाने नवीन तरतूद केली आहे. आता पुढील काळात मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० वाजता प्रचार पूर्णपणे थांबवावा लागणार आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असल्याने १ डिसेंबर रात्री १० नंतर सभा, मोर्चे, ध्वनीक्षेपकाचा वापर आणि सर्व प्रकारचा प्रचार बंद असेल.
आयोगाच्या नव्या आदेशानुसार पूर्वीच्या तीन वेगवेगळ्या निर्देशांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मध्ये मतदानाच्या दिवशी जाहिर सभा बंदीची तरतूद आहे, तर ९ ऑक्टोबरच्या प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात आदेशात मतदानाच्या एक दिवस आधी रात्री १२ पासून प्रचारबंदी नमूद होती. तसेच ४ नोव्हेंबर २०२५ च्या आचारसंहिता आदेशात मतदानाच्या २४ तास आधीपासून प्रचारबंदीचा उल्लेख होता. या तिन्ही तरतुदींमध्ये फरक असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत होती.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशात सुधारणा करत मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० वाजेपासून पूर्ण प्रचारबंदी लागू करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर सभा, प्रचारफेऱ्या, मोर्चे, ध्वनीक्षेपकाचा वापर तसेच जाहिरातींचे प्रसारण तात्काळ बंद केले जाईल. आगामी सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये हीच वेळ लागू असणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष, माध्यमे आणि स्थानिक निवडणूक यंत्रणांनी सुधारित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी केले आहे.