कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते परिसरात दसऱ्याच्या मुहूर्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व संविधान स्तंभाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्त्या जोस्तना विरले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमामुळे गावात सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक जाणीवेला नवे बळ मिळाले आहे.
या भूमिपूजनावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत विविध समाजघटक, तरुण-तरुणी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात व “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सरपंच महेश विरले यांनी संविधान स्तंभामुळे समतेचे तत्त्व जिवंत राहील असे सांगितले, तर जोस्तना विरले यांनी महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजया दशमीच्या निमित्ताने समता, बंधुत्व व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. धामोते गावातील हा उपक्रम आंबेडकरी विचारांच्या प्रसाराला नवे अधिष्ठान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.