रायगड जिल्ह्यातील महामार्गांवर रोज नवनवीन अपघातांचे सत्र सुरूच आहे. अशाच एका घटनेत रेवदंडा बाजारपेठेत दुचाकीच्या धडकेने एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास पारसमल जैन (वय ७५ वर्षे) रेवदंडा बाजारपेठेतील आपले दुकान बंद करून त्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना केळकर बस स्टॉपजवळ त्यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. आरोपी चालकाचे नाव रत्नेश रामबाबू निशाद (वय २३, रा. रेवदंडा मोठे बंदर, मूळ उत्तरप्रदेश) असे असून त्याने बेदरकारपणे व अविचाराने चालवलेल्या मोटारसायकलमुळे हा अपघात घडला. गंभीर जखमी अवस्थेत जैन यांना उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत व्यक्तीचे पुत्र किशोर जैन यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आंगज करत आहेत.