कर्जत तालुक्यातील दहिवली येथील दृष्टिहीन निकिता विष्णू शेंडे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची वाट पुन्हा धरली आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी उजव्या डोळ्याची दृष्टी गमावल्यानंतरही तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र २०२३ मध्ये डाव्या डोळ्याला रेटिना डिटॅचमेंटची गंभीर समस्या निर्माण झाली आणि अनेक शस्त्रक्रियेनंतर तिची उर्वरित दृष्टीही गेली. जवळपास दोन वर्षे शिक्षणापासून दूर राहिल्यानंतर मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे तिने पुन्हा अभ्यास सुरू केला असून, सध्या एलपीसी परीक्षेची तयारी करत आहे.
दृष्टिहीनतेमुळे अभ्यासासाठी डिजिटल पुस्तके, ऑडिओ साहित्य आणि आवश्यक तंत्रज्ञानाची गरज होती; मात्र आर्थिक अडचणीमुळे ही साधने घेणे शक्य होत नव्हते. गेल्या दीड वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या निकिताने अखेर सुधाकर घारे यांच्याकडे आपली अडचण मांडली. तिची परिस्थिती आणि शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन घारे यांनी तिच्या शिक्षणासाठी टॅबलेट उपलब्ध करून दिला. तसेच डोळ्यांच्या उपचारांबाबत वैद्यकीय अहवाल मागवून पुढील उपचारांसाठीही शक्य ते प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली. “मला कायम कोणाच्या आधारावर राहायचे नाही; मला स्वयंपूर्ण व्हायचे आहे,” असा निर्धार निकिताने व्यक्त केला आहे.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होणे हे निकिताचे तातडीचे ध्येय असून, त्यानंतर MPSCच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न आहे. “दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूतीची नाही, तर संधी, आवश्यक साधने आणि विश्वासाची गरज आहे,” असे ती सांगते. दृष्टी गेली असली तरी तिच्या स्वप्नांना अंधार पडलेला नाही. जिद्द, आत्मविश्वास आणि स्वावलंबी होण्याची तीव्र इच्छा यांच्या बळावर निकिता आपली संघर्षयात्रा पुढे नेत आहे. तिच्या या प्रवासातून दिव्यांग व्यक्तींना केवळ आधार नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी आणि साधने देण्याचा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळत आहे.