दि. ४ मे २०२५ रोजी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस (रेल्वे क्र. १२६१९) च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.
ही रेल्वे गाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असताना, पेण हद्दीतील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की त्यांचे शरीर अक्षरशः छिन्नविछिन्न झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक नोंद आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली. मात्र पुढील तपासात समोर आले की मृत व्यक्ती रायगड पोलिस दलातील कर्मचारी आहेत.
सध्या पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की हा अपघात होता की आत्महत्या? कारण घटनास्थळ आणि परिस्थितीवरून साशंकता व्यक्त केली जात आहे.