रात्रपाळीतून परतणाऱ्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; महाड एमआयडीसीतील वाहतूक सुविधेचा अभाव ठरतोय मृत्यूचे कारण

रात्रपाळीतून परतणाऱ्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; महाड एमआयडीसीतील वाहतूक सुविधेचा अभाव ठरतोय मृत्यूचे कारण
पोलादपूर(शैलेश पालकर) : 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड ते पोलादपूर दरम्यान महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील अनेक तरुण महाड औद्योगिक वसाहतीत नोकरीदरम्यान ये-जा करताना जीवाला मुकले आहेत.
यावेळी धडक देऊन ट्रकचालक पसार झाला. यानंतर लोहारे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमी मोटारसायकलस्वाराची विचारपूस केली असता त्याने मयत व्यक्ती परिचयाचा असल्याचे सांगून तो पोलादपूर आनंदनगर येथील वैभव रमेश पालकर असल्याची माहिती दिली. लोहारे येथील ग्रामस्थांनी पोलादपूर शहरातील संबंधितांना कळविले असता पोलादपूरमधील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वैभव पालकर याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठविण्यात आला.
महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने- आण करण्यासाठी एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध केली नसल्याने अनेक तरुणांचा नोकरीला जाताना अथवा परतताना अपघाती मृत्यू झाला आहे. असूनही महाड एमआयडीसीतील कारखानदारांनी अनेक वर्षांपासून अद्याप नोकरदारांची व कामगारांची वाहतुकसुविधा उपलब्ध केली नसल्याने उदरनिर्वाहासाठी रोजंदारी करणाऱ्यांच्या जीवावर बेतण्याच्या दुर्दैवी घटनांचे दरवर्षी सातत्य दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *