श्रीवर्धन या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या श्रीवर्धन-दिघी या सरळ मार्गाचं रुंदीकरणासह डांबरीकरण तीन वर्षापूर्वी दोन टप्प्यात पूर्ण झालं. परंतु या मार्गावरील दांडगुरी ते बोर्लीपंचतन या पाच किलोमीटरच्या रस्त्याचं रुंदीकरण आणि कार्पेट, सीलकाेटचे काम गेले दोन-तीन वर्ष रखडल्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
दिघी-श्रीवर्धन हा २९ किलोमीटरचा तालुक्यातील महत्वाचा मार्ग वडवली फाट्यापर्यंत डांबरीकरणाचा असून वडवली फाटा ते दिघी हा मार्ग दिघी पुणे राज्य मार्गाचा भाग असून तो सिमेंट काँक्रीटचा आहे. श्रीवर्धन-दिघी या मार्गावरील दांडगुरी ते बोर्ली पंचतन या पाच किलोमीटर मार्गावरील आसुफ,खुजारे, कार्ले व बोर्लीपंचतन येथील दत्त मंदिराजवळील रस्त्याची दुरावस्था झाली असून या खड्डेमय रस्त्याचा त्रास प्रवासी, वाहन चालक त्याचबरोबर तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही होत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात अधून मधून केवळ साईड पट्ट्यांची कामं करण्यात आली असून सदरचा ५ किलोमीटरचा रस्ता श्रीवर्धन-दिघी या मार्गाचाच भाग असताना तो पूर्ण का केला नाही ? संबंधित विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का?असा प्रश्न नागरिक व वाहन चालकांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर दिघी-श्रीवर्धन या शेखाडी मार्गे असणाऱ्या मार्गावरील दिवेआगर येथील माऊली रिसॉर्ट ते भरडखोल येथील डागी बंदरापर्यंतच्या रस्त्याचीसुध्दा खड्डयांमुळे दुरावस्था झाली आहे.
या दोनही मार्गांवर वाहन चालवताना कसरत करावी लागत असून खड्डे चुकविताना लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या मार्गांवर प्रवास करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांनी तरी या कामाबाबत लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधून संबंधित विभागाकडून या रस्त्यांची कामं तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
————————————-
वाहनचालक व प्रवासी यांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव असून दांडगुरी ते बोर्ली पंचतन या मार्गावरील साईड पट्ट्या व खुजारे येथील मोरीच्या कामामुळे सदरच्या कामाला विलंब झाला होता.परंतु आता ही कामं पूर्ण झाल्याने पुढच्या दहा-पंधरा दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात होउन येत्या जानेवारी अखेरपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर दिवेआगर ते भरडखोल या मार्गावरील सर्व खड्डे आठवडाभरात भरण्यात येतील.