महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल ₹2,49,80,125 खर्च करण्यात आला होता. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी याचा भव्य उद्घाटन कार्यक्रम आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाला होता. परंतु फक्त वर्षभरातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चर्चेत होता, मात्र निवडणूक कामकाजामुळे नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता निवडणूक संपल्यानंतरही खड्ड्यांची डागडुजी न झाल्याने नागरिक नगरपरिषद प्रशासनाला सवाल करत आहेत.
रस्त्याबरोबर दोन्ही बाजूने बांधण्यात आलेली गटारेही अडथळ्यांनी भरून वाहतूक व्यवस्थेला त्रासदायक ठरत आहेत. गटारातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. प्लास्टिक कचरा, बाटल्या आणि घाण साचल्याने गटारे पूर्णपणे अकार्यक्षम झाली आहेत. यामुळे परिसरात डेंगूसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली असून नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
नगरपरिषदेकडून “३ डिसेंबरनंतर खड्डे भरून काढले जातील” असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आजपर्यंत कामाला सुरुवात न झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. खड्डे भरले जातीलच, परंतु निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार याबाबतही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यानंतरच नगरपालिका प्रशासन जागे होणार का? असा सवाल महाडकरांनी उपस्थित केला आहे.