थायलंडमध्ये अभय ठाकूर यांचा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके

उरण | विठ्ठल ममताबादे
थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे Taurus The Gymचे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात तब्बल २०० किलो वजन उचलत त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदक मिळवत त्यांनी आपल्या नावावर दोन सुवर्णपदकांचा मान नोंदवला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खोपटे गाव, उरण तालुका आणि रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत अभय ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांची कामगिरी युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. Taurus The Gym परिवारासह क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही दोन सुवर्णपदके प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या यशाचे श्रेय अभय ठाकूर यांनी त्यांचे नातेवाईक, मिस्टर इंडिया व मिस्टर वर्ल्ड पदकाचे मानकरी प्रतिक दर्णे, इंडिया मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड पदकाचे मानकरी भूषण पाटील, Taurus Gym परिवार आणि मित्रपरिवाराला दिले आहे. “या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश गाठता आले,” असे अभय ठाकूर यांनी सांगितले. भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या या विश्वविजेत्या खेळाडूच्या दमदार कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त होत आहे.