रस्ता नसल्याने डिलिव्हरी महिलेला झोळीचा आधार; गारमाळ धनगरवाडा आजही विकासापासून वंचित

रायगड | अमुलकुमार जैन
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ धनगरवाडा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना दररोज अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे, नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला चक्क झोळी करून घरापर्यंत आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या प्रकारामुळे गारमाळ धनगरवाड्याच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गारमाळ ते वावोशी हे अंतर सुमारे अडीच किलोमीटर आहे. या रस्त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या कामासाठी वनविभागाची परवानगी मिळालेली नसल्याने अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊनही ग्रामस्थांना रस्त्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गारमाळ येथे धनगर आणि आदिवासी समाजाची सुमारे ७० घरांची वस्ती असून, जवळपास ३५० ते ४०० नागरिक येथे वास्तव्यास आहेत. स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली असतानाही या वस्तीपर्यंत अद्याप रस्ता पोहोचलेला नाही. शालेय विद्यार्थी, कामगार, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना दगड, चिखल आणि खड्ड्यांतून पायपीट करत वावोशीपर्यंत जावे लागते.
पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्याची वेळ आल्यास तिला झोळीच्या माध्यमातून वावोशीपर्यंत आणावे लागते. नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेला अशाच प्रकारे झोळी करून घरी आणावे लागल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निवडणुका आल्या की स्थानिक पुढारी आणि राजकीय नेते विकासाची आश्वासने देतात; मात्र निवडणुका संपल्यानंतर या मूलभूत प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना गारमाळसारख्या वाड्या-वस्त्यांपर्यंत अद्याप रस्ता पोहोचलेला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
वनविभागाची आवश्यक परवानगी मिळवून मंजूर निधीतून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि गारमाळ धनगरवाड्याची वर्षानुवर्षांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.