तळोज्यात देहव्यापाराचे जाळे उद्ध्वस्त; तिघे जेरबंद, ९ महिलांची सुटका

पनवेल | संजय कदम 
तळोजा परिसरातील एका लॉजमध्ये ‘हॉटेल’च्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) धडक कारवाई करत ९ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक आणि दोन वेटर अशा तिघांना अटक करण्यात आली असून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ जुलै रोजी तळोजा येथील हॉटेल अबोड इन, लॉजिंग अँड बोर्डिंग येथे बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. सांकेतिक इशारा मिळताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकून झडती घेतली असता देहव्यापारासाठी ठेवण्यात आलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तपासात लॉजचा व्यवस्थापक बलराम नंजय गोंडा संपूर्ण व्यवहाराचे नियोजन करत असल्याचे, तर वेटर गिरीश शेखर पुजारी आणि कृष्णराज रितेशकुमार पाटील हे ग्राहकांना महिलांची निवड करून देत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी तिघांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने होत होते आणि महिलांना या व्यवसायात कशा प्रकारे अडकविण्यात आले याचा सखोल तपास तळोजा पोलीस करत आहेत.