रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला रोहा शहरापासून पंधरा किलो मीटर अंतरावर असणाऱ्या पालेखुर्द येथील शिक्षण घेत असलेल्या कातकरी आदिवासी समाजातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एंजल कालीकुरी आणि आचल पवार या मुलींच्या जीवनावर आधारित असणाऱ्या सावित्रीच्या लेकी या चित्रपटासाठी राज्य स्तरीय मूल्यांकन प्राप्त झाले आहे. डोंगराळ भागातील मुली यांची शिक्षणासाठी चालणारी धडपड ही प्रभावीपणे चंदेरी पडद्यावर आल्यामुळे पालेखुर्द गावासहित रोहा तालुक्याचे नाव राज्यस्तरीय झळकले आहे.
पुष्कराज बिऱ्हाडे यांच्या निर्मिती व दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात पालेखुर्द गावातील कातकरी आदिवासी समाजातील धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एंजल कालीकुरी आणि आचल पवार या मुलींनी स्वतःच्याच आयुष्यावर आधारित भूमिका साकारल्या आहेत. डोंगर-दऱ्यांतून, जंगलातून दररोज मैलोन्मैल पायपीट करत शिक्षणासाठी जाण्याचा त्यांचा खडतर प्रवास या चित्रपटातून जिवंतपणे उभा राहतो.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही व्यावसायिक कलाकार नसून स्थानिक मुलींनीच वास्तववादी अभिनय केला आहे. त्यामुळे चित्रपटाला अधिक वास्तवदर्शी स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट’ आणि ‘उत्कृष्ट सामाजिक चित्रपट’ अशा महत्त्वाच्या श्रेणींसह बालकलाकारांनाही नामांकन मिळाले आहे, ही या चित्रपटाची मोठी कामगिरी मानली जात आहे.
या चित्रपटामागे केवळ मनोरंजनाचा हेतू नसून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे. दुर्गम भागातील मुलींना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी, बालविवाहासारख्या समस्यांवर प्रकाश टाकत समाजात जनजागृती करण्याचे काम या चित्रपटातून केले गेले आहे. दरम्यान, ‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’ या उपक्रमांतर्गत चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील गरजू मुलींना सायकल वाटप व शैक्षणिक मदत दिली जात आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलींना शिक्षणाची नवी दिशा मिळत आहे.
राज्य पुरस्कारांच्या नामांकनापर्यंत पोहोचलेला ‘सावित्रीच्या लेकी’ हा चित्रपट केवळ चित्रपटसृष्टीसाठी नव्हे, तर संपूर्ण रोहा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या या लेकींची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.