सांबरी गावातील डीसीसी मंडळाने 28 वर्षांपूर्वी सुरू केलेला नवरात्र उत्सव आजही उत्साहाने साजरा केला जात आहे. काही मोजक्या तरुणांनी देवीची स्थापना करून हा उत्सव प्रारंभ केला होता, आज या मंडळाची सदस्य संख्या कायिक पटीने वाढली आहे. कोरोना काळ वगळता आजही तरुणांमध्ये त्याची उत्सुकता आणि जोश अजूनही तितकाच जिवंत आहे.
मंडळाचे अध्यक्ष (माजी सरपंच) संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंडळ सामाजिक उपक्रमातही सक्रिय आहे. विविध सेवाभावी उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात. मंडळाचे सर्व सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असले तरी देवीची ओढ प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आणि आपल्या पाळीच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रेरित करते.
हा उत्सव विशेषतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पद्धतीने साजरा केला जातो. मंडळाच्या कोणत्याही सदस्याला देणगी वसुलीसाठी फिरावे लागत नाही. प्रत्येक सदस्य स्वतःच्या खर्चातून उत्सवात सहभाग घेतो. यावर्षी देवीची मूर्ती मंडळ सदस्य प्रवीण पाटील यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात गावातील सर्व महिला मंडळ, तरुण, आबाल- वृद्ध उपस्थित राहतात, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढते. 28 वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना करताना मेहनत घेतलेल्या मुली आताच्या माहेरवाशिणी आजही या उत्सवाला आवर्जून हजर राहतात.
हा नवरात्र उत्सव फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर गावाच्या सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भागही आहे. यामुळे डीसीसी सांबरी मंडळाच्या सततच्या कार्यामुळे गावात आपुलकी, एकात्मता आणि धार्मिक परंपरेचे जतन होत आहे.