कर्जत तालुक्यात प्रस्तावित टॉरंट जलविद्युत प्रकल्पाच्या धरणासाठी आदिवासींच्या जमिनी जाण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी शेकडो आदिवासींनी भरपावसात कर्जत प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. जागृत कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात ‘जल, जंगल, जमीन आमची’, ‘टॉरंट हटवा, आदिवासी वाचवा’ अशा घोषणांनी कर्जत शहर दणाणून गेले. प्रकल्पाच्या कक्षेत वन विभाग, खासगी आणि आदिवासींची मिळून सुमारे ९६ एकर जमीन येत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.
पोलीस ग्राऊंडपासून सुरू झालेला मोर्चा कर्जत बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रांत कार्यालयावर पोहोचला. मुसळधार पावसाची तमा न बाळगता महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः आदिवासी महिलांनी ‘आमची जमीन, आमचा हक्क’, ‘जमीन वाचवा, जंगल वाचवा’, ‘टॉरंटला इथे नाही प्रवेश’ अशा घोषणा देत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. आंदोलकांच्या मते, प्रकल्पामुळे शेती, उपजीविका आणि पारंपरिक जीवनव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती असून स्थानिक आदिवासींच्या हक्कांचा आणि संमतीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मोर्चानंतर जागृत कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयात निवेदन सादर केले. प्रस्तावित धरणासाठी जाणारी सुमारे ९६ एकर जमीन प्रकल्पातून वगळावी, धरण प्रकल्प रद्द करावा, टॉरंटच्या विद्युत लाईन प्रकल्पाचा पुनर्विचार करावा तसेच स्थानिक आदिवासींचे हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. आता प्रशासन या मागण्यांची किती गांभीर्याने दखल घेते आणि प्रकल्पाच्या व्याप्ती, जमिनींचे स्वरूप व पर्यावरणीय परिणामांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.