
कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर
कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेळे-दोरेवाडी-खांडस रस्त्यालाही बसला असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे. कशेळे, दोरेवाडी, खांडससह आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा स्थानिक मार्ग असून काही काळापूर्वीच त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात डांबराचा थर उखडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत ठेकेदारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाला का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, वयोवृद्ध, महिला, सामान्य नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी याच मार्गावर आठवडी बाजार भरत असताना खड्ड्यांच्या परिसरातच नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला तुटलेल्या झाडांच्या फांद्या आणि कचरा मागील जवळपास महिनाभरापासून पडून असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कशेळे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा कचरा हटविण्यात आलेला नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. फांद्या व कचऱ्यामुळे आठवडी बाजारातील दुकानदारांनाही दुकाने लावण्यासाठी जागा उरलेली नसून काहींना थेट रस्त्यावर दुकाने थाटावी लागत आहेत.
दरम्यान, कशेळे-नेरळ मार्गावरील बाजारपेठेच्या परिसरातही मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असली तरी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कशेळे-दोरेवाडी-खांडस मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, तसेच रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडांच्या फांद्या व कचरा त्वरित हटवावा, अशी मागणी नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. तात्पुरत्या स्वरूपात का होईना, खड्डे बुजवून प्रवाशांना दिलासा देण्याची जबाबदारी ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने पार पाडावी, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Related