बेकायदेशीरपणे वृक्षतोड केलेल्या सागवानी लाकडाची तस्करी करताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला मात्र जप्त केलेलाच मुद्देमाल वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन चोरट्यांनी लाखो रुपयाची सागवानी लाकडं परस्पर बाजारात विकण्याचे प्रताप केल्याचे उघड झाले आहे.
महाड तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत हद्दीत सिंगर कोंड येथे चार दिवसांपूर्वी अनधिकृत सागवानी वृक्षांची कत्तल होत असल्याचे समजताच महाड वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदरच्या ठिकाणी धाड टाकून अनधिकृत रित्या जंगलतोड केलेल्या सागवानी लाकडांचे ओडके जप्त केले त्याची अंदाजे किंमत दोन लाखाच्या आसपास असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
महाड येथील वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन जप्त केलेल्या सागवानी वृक्षांची लाकडाचा पंचनामा केल्यानंतर ती वन खात्याच्या डेपोवर आणणे गरजेचे होते मात्र वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांची सागवानी लाकडे अनधिकृत रीत्या तोडणाऱ्या चोरट्यांनी ती परस्पर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात एका खाजगी व्यापाऱ्याला तब्बल दोन लक्ष रुपयांना विकल्याचे या गावातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. सदरची अनधिकृत पणे केलेल्या सागवानी जातीच्या वृक्षांची लाकडे जप्त केल्यानंतर त्याकडे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्याने सदरची सागवानी जातीची लाकडे रात्रीच्या वेळेस ट्रकमध्ये भरून परस्पर विना परवाना मंडणगड येथे विकण्याचे प्रताप अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या चोरट्यांनी केले मात्र याला वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद होता का अशी चर्चा या परिसरात चर्चिली जाऊ लागली आहे.
वन खात्याच्या महाड येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जप्त केलेली सागवानी जातीच्या वृक्षांची लाकडे लागलीच वन खात्याच्या डेपोमध्ये आणली असती तर लाखो रुपयांच्या महसुलाला वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडावे लागले नसते मात्र झालेली चूक याप्रकरणी आता वनखात्याचे रोहा येथील विभागीय वनसंरक्षक कोणावर कारवाई करणार अशी चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चिली जाऊ लागली आहे.
याबाबत महाड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठिकाणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठवून वस्तुस्थिती जाणून घेतो असे सांगितले मात्र त्यानंतर याबाबत त्या ठिकाणी कोणती कारवाई केली याबाबत त्यांच्याशी संपर्क काढण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.