घरपट्टीवाढीविरोधात पोलादपूरकर आक्रमक; निवेदनाद्वारे दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

घरपट्टीवाढीविरोधात पोलादपूरकर आक्रमक; निवेदनाद्वारे दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
शहर आणि तालुक्यातील विविध समस्यांच्या निवारणार्थ प्रयत्नशील राहण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचातर्फे नगरपंचायत पोलादपूरला गुरूवारी नागरिकांच्या स्वाक्षरीने घरपट्टीवाढीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी महाड येथील मुख्याधिकारी प्रभारी म्हणून उपस्थित राहू शकले नसल्याने नागरिकांनी उपस्थित कर्मचाऱ्याकडे संतप्त भावना व्यक्त करीत निवेदन दिले.
यावेळी दर्पण दरेकर, संतोष मोरे, संदीप गांधी, सुनील भिलारे, बापू जाधव, गणेश कासुर्डे, मुश्ताक मुजावर,मजीद धामणकर, अविनाश जंगम, जाधव, कळमकर तसेच अन्य नागरिकांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करताना नगरपंचायत प्रशासन नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे सांगून प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध व अन्य प्रश्न न सोडविल्याचे निदर्शनास आणून अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून घरपट्टीवाढीसाठी नियुक्त ठेकेदारांसाठीच्या नोटीशीवर प्रभारी मुख्याधिकारी यांची ऐन विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी असताना सही होऊन मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नोटीसा नागरिकांना बजाविण्यात आल्या.
नागरिकांना ठेकेदार अथवा प्रशासनाकडून कशासाठी लेझर मोजणी होत आहे याबाबत माहिती देण्याचे टाळण्यात आले आहे. एकूणच, नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधी यांनी ठेकेदारधार्जिणा ठराव करून नागरिकांच्या हिताला बाधा आणल्याने प्रशासनाने जनसेवक म्हणून जनतेला उत्तरदायी असल्याचे सिध्द करण्याची वेळ आली असल्याचे यावेळी आवाहन उपस्थित नागरिकांतर्फे करण्यात आले.
यावेळी दर्पण दरेकर यांनी पोलादपूरकर जनतेला घरपट्टीवाढीबाबत जनतादरबार अथवा जनरल मिटींग आयोजित करून जनतेचे म्हणणे ऐकून घेत न्याय्य भुमिका घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी निवेदन स्विकारल्यानंतर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या भावना मुख्याधिकारी महोदयांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *