गौप्यस्फोट, ‘माहिती’चा वाद अन् ५१ शाळांचे हस्तांतरण; केणींच्या आरोपांनंतरची पहिलीच महासभा, उद्या रायगड जिल्हा परिषदेत वादळी रणसंग्रामाचे संकेत  

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची राज्यभर तपासणी
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार (३ ऑगस्ट) रोजी दुपारी २ वाजता कुंटेबाग येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात होत असून, यावेळी केवळ विकासकामांवरच नव्हे तर अलीकडील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवरूनही सभागृह चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला व बालविकास सभापती रसिका केणी यांच्या गौप्यस्फोटानंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
काही दिवसांपूर्वी सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला व बालविकास विभागातील विविध बाबींवर उघडपणे भाष्य करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर जिल्हा परिषदेत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी पत्रकारांना माहिती देण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे पत्रक काढले. मात्र, या निर्णयावर प्रसारमाध्यमांसह विविध स्तरांतून तीव्र टीका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तो निर्णय मागे घेतला आणि तीन पदाधिकारी तसेच दोन अधिकाऱ्यांना अधिकृत माहिती देण्यासाठी नियुक्त केल्याचे सुधारित पत्रक प्रसिद्ध केले.
या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निर्माण झालेला तणाव सोमवारच्या सभेत उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेषतः माहिती देण्यावरील निर्बंध, प्रशासनाची भूमिका आणि महिला व बालविकास विभागातील मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सभेच्या अजेंड्यावर एकूण २२ विषय असून, त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेकडील ५१ शाळा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वाधिक चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, आदर्श शाळांसाठी निधी, डिजिटल शाळा प्रकल्प, सोलर ऊर्जा योजना तसेच विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
एकीकडे विकासकामांचे महत्त्वाचे निर्णय, तर दुसरीकडे गौप्यस्फोट, माहितीच्या अधिकारावरून निर्माण झालेला वाद आणि ५१ शाळांच्या हस्तांतरणाचा संवेदनशील मुद्दा अशा तिहेरी पार्श्वभूमीमुळे सोमवारची रायगड जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजणारी आणि वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सभेत नेमके कोणते मुद्दे गाजतात आणि कोणावर प्रश्नांचा भडिमार होतो, याकडे जिल्हाभरातील राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.