गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाचा पळस्पे येथून शुभारंभ

गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाचा पळस्पे येथून शुभारंभ
पनवेल : 
गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ पळस्पे ग्रामपंचायतीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवले जाणार असून ग्रामपंचायतींना विकासकामांमध्ये स्पर्धा करण्याची संधी देत लाखो रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत. पळस्पे ग्रामपंचायतीने राज्यातील पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवावे, अशी अपेक्षा आहे.”
या अभियानांतर्गत:
  • प्रथम क्रमांक – 15 लाख रुपये
  • द्वितीय क्रमांक – 12 लाख रुपये
  • तृतीय क्रमांक – 8 लाख रुपये
    अशी बक्षिसे देण्यात येणार असून विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरही स्वतंत्र पुरस्कार दिले जातील.
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट
  • सुशासनयुक्त व सक्षम पंचायत उभारणे
  • जल समृद्धी व हरित-स्वच्छ गाव निर्मिती
  • सरकारी योजनांचा प्रभावी अंमल
  • लोकसहभाग वाढवणे
  • नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ झालेला हा सोहळा पळस्पे येथे दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखवण्यात आला. महिला बचत गटांनी उभारलेल्या विविध स्टॉलना तटकरे यांनी भेट देऊन कौतुक केले.
राज्य शासनाकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील किमान तीन ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळवावेत, अशी अपेक्षाही मंत्री तटकरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *