गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अलिबाग पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव मिरवणुका तसेच अन्य खासगी कार्यक्रमांमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अलिबाग पोलिसांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विशेषतः गणेशोत्सव मिरवणूक व इतर खाजगी कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीमचा वापर केल्याने ध्वनिप्रदूषण होते. याचा मानवी आरोग्याबरोबरच सामाजिक सुरक्षितता आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. कर्णदोष, हृदयरोग, उच्च रक्तदाब, बालरोग, मनोविकार तसेच मेंदूशी संबंधित विविध आजारांचा धोका वाढू शकतो, असे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, वाणिज्य क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपक, डॉल्बी साऊंड किंवा डीजे साऊंड सिस्टीमचा कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक वापर करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक आणि शांततापूर्ण उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.