गटारी अमावस्या नव्हे; दिप-अमावस्या

आषाढ महिन्यात येणार्‍या अमावस्येला दिव्यांची (दीप) अमावस्या म्हणून संबोधले जाते. ती अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट रोजी असून तिला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. परंतु आज या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून का संबोधतात? याचे कारण कळत नाही. ही अमावस्या नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का…….? की…..,या आषाढ अमावस्येचा आणखीही काही दुसरे महत्त्व आहे….! हे आपल्याला माहीती आहे का…..? ही गटारी आमावस्या समजून लोळण घेऊन साजरी करायची की दिव्यांची अमावस्या म्हणून पूजा बांधून…..? याविषयी हा लेख…..
आषाढी अमावास्या “ तमसो मा ज्योतिर्गमय ”, असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते…,आषाढातील अमावास्या. हा दिवस ‘ दिव्यांची अमावास्या ‘ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दीपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून तेलामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.
आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून, गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून दिव्याची कहाणी ‘ वाचून ह्या पूजेची सांगता होत असे. ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा. हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात. तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत. अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळूनटाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.
पण गेल्या काही वर्षांत आपण मात्र या अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारात लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो,त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो. मांसाहार हा कदाचित आहाराचा अपरिहार्य भाग असेलही; पण मद्यसेवन हा अपरिहार्य भाग कसा असू शकतो….?
अतिरिक्त मद्यसेवनाने धुळीस मिळणारी कुटुंबे उदाहरण म्हणून समोर असतात, माणसे गटारीच्या निमित्ताने मद्याच्या बाटल्याच्या बाटल्या कशा रिचवतात नव्हे…. तर कशा रीत्या करतात…? पण गटारी म्हणजे अशीच असते काय….? ‘गटारी अमावस्येच्या विधीचे वर्णन जर खरे असेल, तर अशी गटारी आता किती जण पाळतात…..? भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणतेयाचे हे उत्तम उदाहरण. गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली.
गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली. आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो…..जशी आज आपल्याकडे H1-N1 म्हणजेच स्वाइनफ्लू, मलेरिया, सर्दि-पडसे आदी रोगांच्या महाभयंकर साथींचे प्रलय माजले आहे. ते होऊ नयेत म्हणून पूर्वापार देवी-देवतांची आराधना होई; त्या प्रसन्न व्हाव्यात यासाठी विधी केल्या जात, बळी दिले जात.आषाढातली अमावस्या म्हणजे ‘दिवळी अमावस्या‘, किंवा ‘दिव्याची आवस‘ असे म्हणतात.हल्ली त्याला ‘गटारी ‘ हे घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक…..! तेव्हा (पूर्वी) घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच असत.त्या दिवशी ते घासून पुसून लख्ख करायचे. संध्याकाळी दिवे लागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. कणे-रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलंवाहायची. गोडाचा नैवेद्य ठेवायचा. लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची.आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं. तसंच त्या रात्री व दुपारी सुद्धा जेवणाचा मोठा घाट घातलेला असतो. जावई-लेकी यांना मोठ्या मानानं जेवायला बोलवायचं.मटण, कोंबडी- वडे.. वड्यांतही एक गोड वड्यांचा प्रकार असतो. नारळाचं दूध, गूळ यात तांदळाचं पीठ उकडून त्याचे वडे करतात. खुसखुशीत, मस्त ! ते मटणाच्या रश्श्यात बुडवून नाही खायचे. गोड असल्यामुळे नुस्तेच गरमगरम हादडायचे. असा हा आमचा आषाढ मास. मनसोक्त मटण, कोंबडी, मासे खाण्याचा. दुस-या दिवशी श्रावण मास चालू होणार. सोवळं ओवळं, उपासतापास,व्रतवैकल्यांचा…..रात्रीच सारी ओशट भांडी घासून टाकायची. चुलीला शेणपोतेरं करायचं, स्वयंपाकघर झाडूनझुडून सारवायचं.रात्रीच झाडू, पोतेरी, हातपुसणी, दूध, पाणी गाळायची फडकी धुवून टाकायची.मटणाच्या जेवणानं पोट जड झालेलं, अनावर सुस्ती आलेली. मटणा-कोंबडीचे विविध प्रकार करून त्यासाठी वाटण- घाटण करून शरीराची दमणूक झालेली; पण तरी सारी कामं रात्रीच उरकून टाकायची. उद्या येणा-या श्रावणासाठी,त्याच्या आगत-स्वागतासाठी घरदार, झाडलोट करून स्वच्छ करायचं. मग गणपती, गौर जाईपर्यंत वरणभात, भाजी,कोशिंबिरी तसेच चटण्या, लोणच्याच्या बरण्यांची व पापडांच्या डब्याची झाकणं उघडली जातात व दही, दूध, ताकावर जोर दिला जातो.
-महेंद्र स. माने, नागोठणे