मुलीला कडेवर घेताच छातीत तीव्र वेदना; ३२ वर्षीय तरुणाचे फुफ्फुस कोसळले, ‘कीहोल’ शस्त्रक्रियेतून जीवदान

कोलाड | श्याम लोखंडे
सहल म्हणजे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण आणि आठवणी साठवण्याची वेळ; मात्र केरळला कुटुंबासोबत गेलेल्या ३२ वर्षीय तरुणासाठी हीच सहल जीवघेणी ठरली. सहलीदरम्यान मुलीला कडेवर उचलून घेतल्यानंतर अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास स्नायूंवर आलेल्या ताणामुळे झाला असावा, असे समजून त्याने दुर्लक्ष केले. मात्र, पुढील तपासणीत डाव्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात हवा साचून फुफ्फुस कोसळल्याचे, म्हणजेच न्यूमोथोरॅक्स झाल्याचे निदान झाले.सहलीहून परतल्यानंतर खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टिमने ‘कीहोल’ शस्त्रक्रियेद्वारे या रुग्णावर यशस्वी उपचार केले.
प्रवासादरम्यान अचानक उद्भवलेल्या या त्रासानंतर त्याच्या डाव्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात हवा साचून न्यूमोथोरॅक्स (Pneumothorax)ची समस्या उद्भवली. न्यूमोथोरॅक्स म्हणजे फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमधील पोकळीत (प्ल्युरल स्पेसमध्ये) हवा शिरल्यामुळे फुफ्फुस आकुंचन पावणे. सुरुवातीच्या उपचारानंतर फुफ्फुस पुन्हा पुर्ववत झाले; मात्र उपचार थांबवण्याचा किंवा छातीतील नळी काढण्याचा प्रत्येक प्रयत्न केल्यानंतर फुफ्फुस पुन्हा आकुंचन पावत होते. मेडिकव्हर हॉस्पिटलचा वतीने दर आठवड्याला रोहा येथे ओपीडीचे आयोजन केले जाते. या ओपीडीत रुग्णाने तज्ज्ञांचा सल्ला घेतला व त्यानंतर त्यांना खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील डॉ. शाहिद पटेल (पल्मोनोलॉजिस्ट), डॉ. तनय सिन्हा (पल्मोनोलॉजिस्ट) आणि डॉ. प्रिया एशपुनियानी(थोरॅसिक सर्जन) यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या टिमने या दुर्मिळ गुंतागुंतीवर यशस्वी उपचार केले.
रोहा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय आसिफ यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारची आरोग्यासंबंधी समस्या नव्हती. केरळमध्ये कुटुंबासोबत सुट्टीवर असताना आपल्या मुलीला उचलल्यानंतर त्यांना अचानक छातीत डाव्या बाजूला तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. पुढील काही दिवसांतच त्यांचा त्रास वाढत गेला. विमानाने प्रवास केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर ६ जून २०२६ रोजी ते मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
तपासणीसाठी करण्यात आलेल्या एचआरसीटी(HRCT) स्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाचा मोठ्या प्रमाणात भाग आकुंचन पावल्याचे दिसून आले. फुफ्फुसाच्या आकुंचन पावल्याने हृदय आणि छातीतील इतर संरचना उजव्या बाजूला सरकल्या. त्यांची ऑक्सिजन पातळीही ८६ टक्क्यांपर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे ही गंभीर आणि तातडीच्या उपचारांची गरज असलेली परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले.
मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी विभागाच्या टिमने तातडीने पिगटेल कॅथेटर बसवला. छातीत साचलेली हवा बाहेर काढून फुफ्फुस पुन्हा फुगवण्यासाठी ही बारीक नळी वापरली जाते. या उपचारामुळे सुरुवातीला फुफ्फुस पुन्हा फुगले. मात्र नळी काढण्याचा किंवा काही काळासाठी बंद करण्याचा प्रयत्न केला असता फुफ्फुस पुन्हा आकुंचन पावत असल्याचे दिसून आले. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे पुढील उपचारांसाठी थोरॅसिक सर्जरी टीमची मदत घेण्यात आली.
डॉ. शाहिद पटेल, पल्मोनोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, म्हणाले, रुग्णाला मोठ्या प्रमाणात टेन्शन न्यूमोथोरॅक्स झाला होता. या स्थितीत फुफ्फुसाभोवती हवा सतत साचत राहते आणि त्यामुळे फुफ्फुस आकुंचन पावण्यासोबतच हृदय व प्रमुख रक्तवाहिन्यांवरही दबाव येऊ शकतो. एवढ्या तरुण वयात इतक्या मोठ्या प्रमाणात न्यूमोथोरॅक्स होणे तुलनेने दुर्मिळ आहे. रुग्णाला स्थिर करण्यासाठी साचलेली हवा तातडीने बाहेर काढणे आवश्यक होती. मात्र फुफ्फुसाच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘बुल्ला’ नावाच्या असामान्य हवाभरलेल्या पिशवीमुळे सतत हवा गळती होत असल्याचे आढळले. अशावेळी केवळ औषधोपचार आणि नळीच्या माध्यमातून केलेले उपचार पुरेसे ठरत नसल्याने थोरॅसिक सर्जरी टीमशी चर्चा करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत उपचारांना विलंब झाल्यास श्वसन निकामी होणे, शॉक आणि अगदी मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो.
डॉ. तनय सिन्हा, पल्मोनोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, म्हणाले, १९ जून २०२६ रोजी VATS बुल्लेक्टॉमी आणि प्ल्युरेक्टॉमी करण्यापूर्वी रुग्णावर ऑटोलॉगस ब्लड पॅच ही प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये रुग्णाचे स्वतःचे रक्त छातीतील नळीमार्फत देऊन बाहेर पडणारी हवा बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हवा बाहेर पडणे सुरूच राहिल्याने आम्ही VATS कमीतकमी छेद पाडून ‘कीहोल’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेत फुफ्फुसावरील खराब झालेला हवेचा फुगा(bulla) काढण्यात आला आणि भविष्यात पुन्हा फुफ्फुस आकुंचन पावण्याचा धोका कमी करण्यासाठी प्ल्युरेक्टॉमी करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कायलोथोरॅक्स ही दुर्मिळ गुंतागुंत झाली. या स्थितीत छातीमध्ये लिम्फॅटिक द्रव साचते. आहारातील बदल आणि पोषणात्मक उपचारांच्या मदतीने ही समस्या यशस्वीपणे नियंत्रणात आणण्यात आली. रुग्णाला ICD ट्यूबसह घरी सोडण्यात आले. त्यानंतर आठवड्याने बाह्यरुग्ण विभागात ही नळी काढण्यात आली. त्यांचे फुफ्फुस पुर्ववत झाले आणि कोणतीही पुनरावृत्ती झाली नाही.
डॉ. शाहिद पटेल यांनी पुढे सांगितले, ज्यांना स्पॉन्टेनियस न्यूमोथोरॅक्सचा त्रास झाला आहे, त्यांनी धूम्रपान पूर्णपणे टाळावे. अचानक छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित फॉलो-अप करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातील धोका कमी करता येईल.
आपला अनुभव सांगताना रुग्ण आसिफ म्हणाले, सगळं इतकं अचानक घडलं की सुरुवातीला मुलीला उचलल्यामुळे स्नायूंवर अतिरिक्त ताण आला असेल असे मला वाटले. मात्र काही वेळातच मला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला. माझे फुफ्फुस आकुंचन पावले होते असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मला खूप भीती वाटली. डॉक्टरांनी प्रत्येक टप्प्यावर उपचार समजावून सांगितले आणि माझा आत्मविश्वास कायम ठेवला. आज मी पुन्हा व्यवस्थित श्वास घेत असून माझ्या कुटुंबासोबत सामान्य जीवन जगत आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मी मनापासून आभारी आहे.
नीरज लाल, रिजनल डायरेक्टर, महाराष्ट्र आणि कर्नाटक विभाग, मेडिकव्हर हॉस्पिटल्स म्हणाले, या प्रकरणातून त्वरित निदान, प्रगत शस्त्रक्रिया कौशल्य आणि पल्मोनोलॉजिस्ट, थोरॅसिक सर्जन, इंटेन्सिव्हिस्ट आणि रिहॅबिलिटेशन टीममधील प्रभावी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित होते. दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये अशा प्रकारचे समन्वयित उपचार रुग्णाच्या यशस्वी पुनर्प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
संदीप जोशी, सेंटर हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितींमध्येही रुग्णांना वेळेवर आणि अचुक उपचार देण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल्स सदैव प्रयत्नशील असते. रुग्णाला शक्य तितका चांगला उपचार मिळवून देणे आणि त्याला सुरक्षितपणे पुन्हा सामान्य जीवनात परतण्यास मदत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.