‘एक राज्य, एक टोल’साठी १५ ऑगस्टला चांढवे टोल प्लाझावर राष्ट्रगीत आंदोलन

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कृष्णा करंजे यांनी पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवासी नायब तहसीलदार नितीन पाटील यांना एक राज्य एक टोल अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनी चांढवे टोल प्लाझा येथे राष्ट्रगीत गायन करीत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्यात फिरताना एका वाहनाला दिवसाला एक टोल असावा,. एक टोल भरण्याची पावती असणाऱ्या वाहनास राज्यात सर्वत्र मुक्त संचार करता आला पाहिजे. देशातील रस्ते अत्यंत खराब आहेत. निकृष्ट दर्जाचे आहेत. कोणता रस्ता कधी खचेल, कोणता पूल कधी पडेल, याबाबत लोकांच्या मनामध्ये धास्ती आहे. मोठमोठ्या खड्ड्‌यांमुळे वाहनांना दुरुस्तीची कामे व खर्च येत आहे. इंधनाचे दर वाढलेले आहेत. गाडीचे हप्ते व दुरुस्ती खर्चामुळे जनता त्रस्त आहे. शेतीची नापिकी, बेरोजगारी, व महागाईमुळे लोक आर्थिक संकटात आहेत.
शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय कामाकरिता मोठ्या शहराकडे जाताना दहा ठिकाणी टोल भरण्याची सक्ती हा जनतेच्या उत्पन्नावर दरोडा आहे. वाहन खरेदीवेळी वन टाइम रोड टॅक्स भरला जातो. रोज इंधन भरताना इंधनावर टॅक्स भरावा लागतो. दरदिवशी नागरिकांनी सरकारला किती रक्कम करामागे द्यावी, यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात यापुढे एका वाहनाला एका दिवसाला एकच टोल घेण्यात यावा,  या प्रमुख मागणी करिता येत्या 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक युवती विद्यार्थी महाड ते पोलादपूरदरम्यानचा चांढवे टोल प्लाझा येथे सकाळी 10 वाजता हातात राष्ट्रीय तिरंगा ध्वज घेऊन राष्ट्रगीत म्हणणार आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.